स्टँड वर एक दिवस
स्टँड वर दिवसभर बसून रहा , एका पॉईंट नन्तर आजूबाजूचे आवाज , कुणाची भांडणं , चिवडा , वडापाव , लोणचं , सगळं एकदम काही वेळानन्तर न्यूटरल वाटू लागतं , भिकारी तास तास भर झोपतात त्यांची झोप भयानक वाटते , निर्धास्त मेंदू आणि उपाशी पोटाची भूक घाबरवून सोडते , झोपेतून उठल्यावर त्यांचे चेहरे भयानक सिरीयस असतात , एकटक पाहत रहातात , हरवण्यास काही नसलं , स्वप्न नसली , आशावाद नसला की चेहरे असे होत असतील अस वाटतं , म्हातारी माणसं चेहऱ्यावर पुस्तकाची पानं ठेवल्यासारखी वाटतात ज्यात तक्रार असते आयुष्याची न मिळालेल्या सुखाची न भेटलेलेल्या प्रेमाची , उबेची …. काही बेवडे असतात पावलं इकडे तिकडे टाकत जवळ येऊन बसतील , वेळ विचारतील पैसे मागतील , भिकारी येतील थाळी पुढे करतील हे फार लाजवतात , आपलंच आपल्या मनासोबत भांडण लावून देतात दिले तरी नाही दिले तरी.
कधी कोणी अचानक येऊन बाजूला बसलं आणि त्याचा घाण वास मारत असला तर मी लगेच रिऍक्ट होत नाही , त्यांना काय वाटेल अस विचार येतो मग काहीतरी कारण काढून बाजूला जातो …
खूप श्रीमंत लोकं त्या उंच बसेसने जातात , ते इकडे तिकडे पाहत बसत नाहीत , त्यांच्या देहबोलीत एक वेगळाच जग जिंकल्याचा अविर्भाव असतो , सगळं जग आपल्या पासून २ ३ मीटर पर्यंत सुंदर आणि सुखी आहे असं समज घेऊनच जगत असावेत बहुतेक , त्यांच्या कातड्या जाम उजळ असतात , पहायला बरं वाटतं पण जास्त वेळ पाहत बसलात तर त्यांना काही घेणं देणं नसतं. कपल्स असतात त्यांच्या कडे पाहून वाटतं किती भारी असतं अस कुणी तरी असणं , भेटणं , हसणं , स्वप्न रंगवन पण नन्तर वाटतं ह्यांना पण थोडया दिवसांनी एकमेकाचा कंटाळा येईल का , मग मी ओळखू लागतो कोण कुणाला आधी सोडेल कोण कुणासोबत किती प्रेम करत असेल… कंडक्टर आणि ड्रायव्हर गाडी थांबल्या थांबल्या थुकतात त्याच गणित अजून समजलं नाहीय , जुन्या टीव्ह्या , जुने पंखे , बाकडी , बुडाशी लाल झालेले खांब , कोपरे , अरबट वास मारणाऱ्या मुताऱ्या त्याचा विरोधात असलेल्या बातम्यांच्या एल इ डी पाट्या , कॅमेरे , नवीन बसा सगळं वेग वेगळ्या टोकाचं , माणसं पण आणि वस्तू पण…..
अजिंक्य रोकडे
Very nice
ReplyDeleteधन्यवाद
Delete❤️❤️💯
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद
Delete💕✌️
ReplyDelete