Skip to main content

स्टँड वर एक दिवस

     स्टँड वर दिवसभर बसून रहा , एका पॉईंट नन्तर आजूबाजूचे आवाज , कुणाची भांडणं , चिवडा , वडापाव , लोणचं , सगळं एकदम काही वेळानन्तर न्यूटरल वाटू लागतं , भिकारी तास तास भर झोपतात त्यांची झोप भयानक वाटते , निर्धास्त मेंदू आणि उपाशी पोटाची भूक घाबरवून सोडते , झोपेतून उठल्यावर त्यांचे चेहरे भयानक सिरीयस असतात , एकटक पाहत रहातात , हरवण्यास काही नसलं , स्वप्न नसली , आशावाद नसला की चेहरे असे होत असतील अस वाटतं , म्हातारी माणसं चेहऱ्यावर पुस्तकाची पानं ठेवल्यासारखी वाटतात ज्यात तक्रार असते आयुष्याची न मिळालेल्या सुखाची न भेटलेलेल्या प्रेमाची , उबेची …. काही बेवडे असतात पावलं इकडे तिकडे टाकत जवळ येऊन बसतील , वेळ विचारतील पैसे मागतील , भिकारी येतील थाळी पुढे करतील हे फार लाजवतात , आपलंच आपल्या मनासोबत भांडण लावून देतात दिले तरी नाही दिले तरी. 

   कधी कोणी अचानक येऊन बाजूला बसलं आणि त्याचा घाण वास मारत असला तर मी लगेच रिऍक्ट होत नाही , त्यांना काय वाटेल अस विचार येतो मग काहीतरी कारण काढून बाजूला जातो … 

      खूप श्रीमंत लोकं त्या उंच बसेसने जातात , ते इकडे तिकडे पाहत बसत नाहीत , त्यांच्या देहबोलीत एक वेगळाच जग जिंकल्याचा अविर्भाव असतो , सगळं जग आपल्या पासून २ ३ मीटर पर्यंत सुंदर आणि सुखी आहे असं समज घेऊनच जगत असावेत बहुतेक , त्यांच्या कातड्या जाम उजळ असतात , पहायला बरं वाटतं पण जास्त वेळ पाहत बसलात तर त्यांना काही घेणं देणं नसतं. कपल्स असतात त्यांच्या कडे पाहून वाटतं किती भारी असतं अस कुणी तरी असणं , भेटणं , हसणं , स्वप्न रंगवन पण नन्तर वाटतं ह्यांना पण थोडया दिवसांनी एकमेकाचा कंटाळा येईल का , मग मी ओळखू लागतो कोण कुणाला आधी सोडेल कोण कुणासोबत किती प्रेम करत असेल… कंडक्टर आणि ड्रायव्हर गाडी थांबल्या थांबल्या थुकतात त्याच गणित अजून समजलं नाहीय , जुन्या टीव्ह्या , जुने पंखे , बाकडी , बुडाशी लाल झालेले खांब , कोपरे , अरबट वास मारणाऱ्या मुताऱ्या त्याचा विरोधात असलेल्या बातम्यांच्या एल इ डी पाट्या , कॅमेरे , नवीन बसा सगळं  वेग वेगळ्या टोकाचं , माणसं पण आणि वस्तू पण…..

अजिंक्य रोकडे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माणसाने गझल ऐकली पाहिजे 🌼

माणसाने दुःखात गझल ऐकली पाहिजे दुःखात कवाली आणि सुखात बॉलिवूड गाणी ऐकली पाहिजेत पहाटे अभंग मदमस्त रॅप ऐकूनच माज केला पाहिजे पाहिजे क्लासिकल पण क्वचित  पंगतीत उठ बस असायला नास्तिक असावं लॉजिकने आस्थिक असावं सोयीने  मजबूर असावं सगळ्या दिशेकडून वळून पाहताना डोळे समोर असावे  डोळे कशाने थकलेत हे समजू नये पुढच्याला समज गैरसमज असावे  पुढचा कॉन्फयुज्ड करून सोडावा मोडावा अहंकार एका एकाएकाचा आपला स्वतःचा कमीपणा करून घेऊन पापं मोजता मोजता  बोटं कमी करावी पुण्य सावली सारखं जवळ असून लंब असावं अंदाज बांधू नये कुणी कुणी आकलन तर करूच नये केलेले अंदाज चुकावे आपल्या आपल्या मध्ये एक एक वयक्तिक फसावे माणूस म्हणून वागावे हे आपणच उगा बोलावे ठेचकाळलेली पावलं असावी उठाव्या पाऊलखुणा सगळीभर आसमंतात विरोधाला विरोधाभासाने उत्तर द्यावी अंगलट गोष्टी विसर्जित करावी मित्रांचे चांगले सल्ले घ्यावे  कपडे धुतात तसे करावे ते करावे साबण राहावा भांड्यानावर धुतल्यावर  तशी सल राहावी मनाच्या पटलावर  आणि जेव्हा काहीच काही नसेल तेव्हा  निर्विकार आठवला पाहिजेल  विश्वाचा...

गुडूप व्हावं लागतं...😌

वारसा व्हायला  आधी गुडूप व्हायला लागतं उदरात आज गेलेलं  खोदतील तेव्हा  रक्त मिळेल  का कार्बनच जास्त मिळेल उकरून उकरून  अस काय उकरतो आपण भूतकाळ  इतिहास  मढी काय निकष असतील तरी किती सापळ्यांचा ढीग लागतो स्टेनलेस स्टीलची भांडी लागतात का मदरबोर्ड पण चालतील  संस्कृती आणि खाद्य  पेटित ठेवलेल  रेशनकार्ड पाहून समजतील डब्यात तांदूळ करंड्यात कुंकू देवळात देव सगळं इथेच असेल निकष असे काय आहेत जागतिक व्हायचे   व्यापारावर चलनावर  देवावर मूर्तीवर चित्रावर  की फक्त गुडूप होण्यावर की वारसा व्हायला  आधी गुडूपच व्हायला लागतं अजिंक्य रोकडे.....

म्हातारा चांगला होता..... 🌱

घरा सुधरू लागली हात, वाडीतली पोरा मोठी व्हाया लागलीत हात, पैसा आलाय, म्हातारा गेल्यापासून एकटीच मरतेय ह्या मापाच्या घरात, मला तरी कशाला हवाय मरायला चांगला घर, पोरा बाला असती तर एकांदी बारीस वाटला असता, काय रुबाब होता नय, सावकार आमचा म्हातारा मेला दारू नी वाट लावलंन नाहीतर काय जमीन म्हणून होती, नवीन आलली घरी तेव्हा म्हतारा अडल्या नडल्या माणसाला उभा राहायचा, आता कोण बोलील काय?मला पण नको झालाय हा जिना, म्हाताऱ्याची रया गेली ती जमीन लुबाडलिन तेवा, नाहीतर म्हातारा माझा चांगला होता,शेती वर सगला संसार उभा केलेलंन, पण जमीनच परकी झाली आणि म्हातारा येडाच झाला, दारू काय आणि मला शिव्या काय,आंब म्हणून काय यायचं, मला पिऊन आला कि बोलायचा आपली कलमा आणि तू एकसारखी मेली वांझोटी झालीयत, मी आपली गप गार देव्हाऱ्यात जाऊन टिपा गालित बसायची, कुणाला सांगणार, भयनी झाल्या तरी त्यांना त्यांचा याप काय कमी होता, मेली ही पुरुष जातच घोड्यान काढलली, किती पण जीव आटवा मेली बाई माणसाला ऐकून दाखवतील, मेली गुलाम झाली नाय ती कधी, तसा होता मेला चांगला पैसं कमी झाल्यावर डालगी बनवू लागलेला, हाताला कला होती, असा उपा...