रिलेट होणं बंद होतंय...

    आता आता गाणी रिलेट होत नाहीत , बदलून बदलून इच्छा मरते , गाणी ऐकण्याची , मग नुसतं म्युसिक मिळतं का पाहायचं , कधी बासरी , कधी तबला वगरे , एखादा ट्रान्स ज्यात काहीच नसेल फक्त म्युसिक , शब्द आले की एकत्र रिलेट होतं नाहीतर नाही होत , नको वाटतं ते गाण्यात बुडून रिलेट होणं…
      सुरूवात ह्याची आठवी मध्ये झालेली , मित्राकडे रेडिओ होता , त्यावर " ओये राजू प्यार न करना " , " इश्क न करना " , " वो लड़की बहुत याद आती है " लागायचे , मला फार आवडायची ती गाणी , वडिलांनी बटन स्लाईड होऊन खाली येणार नोकियाचा मोबाईल घेतला , टीव्ही होती त्यावर दूरदर्शन वर जुनी गाणी लागायची " मै ही मैं हु " ,  " कौन है जो सपनो में आया " जाम भारी गाणी , किशोर सर , रफी सर आणि मुकेश सर , समजायचं काही नाही जास्त पण मज्जा यायची , लिरिक्स असावे तर असे , पण त्या सुरूवातीच्या ४ ५  मिनिटाच्या म्युसिकचा कंटाळा यायचा , 9XM घरात लावणं म्हणजे विचित्र / संस्कारहीन असल्यागत समजलं जायचं , घरातल्या त्या मोबाईलला रेकॉर्डर होता , रेडिओची गाणी , लग्नात वाजणारी       "रेतीवाला नवरा" , "नवरा आला वेशीपाशी" , "जैसे ज्याचे कर्म" , "आता तरी देवा मला पावशील का" , गवळणी ; ऐकायचो आणि मोबाईलला रेकॉर्ड पण करायचो पाठ करून स्वतःच्या आवाजात ……
      दादा कॉलेजात जायला लागला या, तेव्हा कुठे 9XM लावू लागलो , "तुम जो आये" , "पी लू तेरे नीले नीले"  आणि "ओम शांती ओम" , "सावरीया" अचानक धडाधड गाणी समोर येऊ लागली , बहुतेक ते बॉलिवूड मधलं गाण्यांचं मिनी रेवोल्युशन असावं , टीव्हीच्या स्पिरकला मोबाईल चिकटवून , आवाज फुल करून गाणी रेकॉर्ड करावी लागायची , मग खर खर आवाजात ऐकत बसून पाठ करायची , कागदावर लिहून शाळेत न्यायची , बस मध्ये म्हणून दाखवायची , ताल सूर न्हवता पण कॉन्फिडन्स माउंट एव्हरेस्ट एवढा होता…
       मित्राने डिव्हिडी प्लेयर आणि दोनशे पन्नास रुपये वाले दोन डेग आणले होते , एक घरात आणि एक घराच्या बाहेर लावला होता , मी शाळेतून येऊन आमच्या मागच्या दारात बसायचो तेव्हा त्याचाकडे बरोबर पाच वाजता गाणी सुरू व्हायची , सुरूवात क्रिश मधल्या "आयो सुनाऊ प्यार की एक कहानी"  ह्या गाण्याने व्हायची , मला तो मित्र कुल वाटायचा , पण ते गाणं झालं की पुढची गाणी जाम विचित्र लावायचा , मग मी पण हट्ट केला डिव्हिडी प्लेयर घेण्याचा , जेवण कमी केलं , म्हणजे बंद केलं , आजारी पडलो , दोन दिवसात मिळालं , बहुतेक मी केलेला असा हा एकच हट्ट मला आठवतो ; डिव्हिडी प्लेयर सोबत सिड्या आणल्या , एका सीडी मध्ये पाच पिक्चर , एका सीडी मध्ये अतिफ , के.के , रहमान सर्वांची मिळवून ३०० गाणी , पण माझ्याकडे डेग न्हवता , पण मित्राने मला दिला , तो मी माझ्या घराच्या बाहेर सर्वांना ऐकू जाईल असा लावला, पण आवाज वाढवला की शिव्या खायला लागायच्या , मग त्याचा पण कंटाळा आला …..
        परत घरात नवीन मोबाईल आला , त्यात नेट चालायचं , मेमरी कार्ड पण , मग सुरुवात झाली ऑपेरा मिनी वरून गाणी डाउनलोड करण्याची , २५ रु. ला   ४० एम.बी , एका नेट पॅक मध्ये ३-४ गाणी डाउनलोड व्हायची , अशी  ७००-८०० गाणी मी डाउनलोड केली ; अतिफ , के.के , मिथुन , रहमान , सानू , उदित , शाकत अमानत अली , माझ्या कलेक्शनवर मला जाम गर्व वाटायचा ….
         एक दिवस "मै तेनु समजावा" विरसा बैंडचं गाणं ऐकलं , मग तशीच गाणी शोधू लागलो आणि राहत सोबत ओळख झाली मग त्याचा फोल्डर वाढला , त्याच्या सहवासाने नुसरत सोबत ओळख झाली , मग वाटलं हा तर सर्वांपेक्षा भारीय …. मग पाकिस्तानी सिंगर्स बद्दल प्रेम वाटू लागलं , मग अली जफर सोबत ओळख झाली , कसली जबरदस्त पर्सनलिटी , आवाज , एकदम रुबाबदार …..
         मग हनी सिंग ,  बादशाह , रफ्तार ; त्यांचे ते वल्गर गाणी पण सोडली नाहीत , मग हा प्रवास ग्रॅज्युएशन मध्ये emiway , divine , fotty seven चालूच आहे … पण आता आता रिलेट होता येत नाही …कश्यासोबतच ; हळू हळू मोबाईल बदलत गेले , मेमरी कार्ड हरवत गेले , म्युसिक बदलत गेलं , लिरिक्स बदलत गेले , मी पण तिथेच , बस रिलेट होणं बंद झालं …..
          

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼