गावातला परा

       गावातला परा गावभर रेघोट्या मारत कनेक्टेड असा फिरत राहतो , लहानपणी नव्हे आता पण विचार येतो हे डिजाईन केलेलं असेल का कोणी ही गावं वसवताना , आता गावाची संस्कृती ह्या पऱ्याकाठी येऊन वसली असा विचार आला तरी हसू येणारच , तर परा म्हणजे बायका वरच्या अंगाला कपडे धुतात , तर खालच्या अंगाला लोक हागायला जायचे आता नाही जात , आता घरोघरी झालेत शौचालय …
       आमच्या लहानपणी पण ज्या पऱ्यासंबंधी कथा होत्या तश्या अजून आहेत हे आताच्या लहानपोरांकडून मला कळलं , आमच्या वेळी अश्या अफवा की तेथे हडळ असे , त्या पऱ्यात एक मोठा साप आहे , एकटा माणूस जाऊ नाही शकत , पिलेल्या आणि नागड्या माणसाला काही धोका नाही , थोडं समजायला लागलं तेव्हा जाऊ पण लागलो आम्ही खाली , एकदा आम्ही तिथे कबुतरांसाठी छत्रीचा तारांची फासकी लावली त्यात पोपट भेटला , त्याला घरी आणलं पण ठेवायच कशात पिंजरा नाही मग उंदराचा पिंजऱ्यात त्याला ठेवलं , त्यावर कापड टाकलं , मस्त झोप लागली मला  , पण सकाळी तो तारा वाकवून गायब , जाम बेकार वाटलं , ब्रेकअप झाल्यावर एवढं दुःख होउ शकत नाही तेवढं मला झालेलं तेव्हा , खूप सारे कबुतर पकडले होते , त्यांना बांधून ठेवायचो , कॉलेजला गेल्यावर आवारापन पाहून मग वाईट वाटलं , मग जी लहान मुलं कबुतर पकडायची त्यांचा कडून मी ती विकत घेऊन त्यांना सोडू लागलो , मग मुलं घेतानाच सांगू लागली की सोडणार असशील तर घेऊच नकोस , हे साले जातात आणि सर्वांना आपली टेक्निक सांगतात , सोडायच असलं तर लांब जाऊन कुठेतरी घाटात सोड ……. नखभुंगे शोधायला किंवा खेकडे पकडायला देखील जाणं व्हायचं दुपारी उन्हातून , पण योगायोगाने ताप आला की झालं दुपारच्या वेळी तिथे गेलास म्हणून ताप भरला अशी पोरांच्यात हवा व्हायची ….आठवी मध्ये गेल्यावर एका वयाने मोठ्या मित्राने मायक्रोमॅक्सचा अँड्रॉइड घेतला त्यावर आम्हाला रात्री घोस्ट डिटेक्टर आणून रात्रीचा वेळी चेटकीण दाखवली आणि खूप दिवस मग चर्चा आणि भीती , मग ते यॅप चेक करायला आम्ही मंदिरात घेऊन गेलो तर तिथे पण दिसली चेटकीण मग खात्री झाली की बोगस आहे हे यॅप , अस सर्व ……
        किनाऱ्यावर एक उंच वडाच झाड होत , त्यावरून जो सिक्स मारेल तो भारी खेळतो असा समज , हा एकमेव असा निर्देशांक असेल काय ते उत्तम खेळाडू साठी , yoyo टेस्ट आता आता आली , माझा नुकताच दहावी मध्ये कधी सिक्स उंच झाडावरून जाऊ लागला होता , पण त्याच वर्षी पावसात ते अवाढव्य झाड कोसळलं , खूप खूप बेकार वाटलं तेव्हा त्यावरून सिक्स मारू शकलो नाही म्हणून , पण आता वाईट वाटत की त्या झाडाने किती संस्कृती किती पिढ्या पाहिल्या होत्या , त्या झाडाखाली जुन्या साड्या बांधून भारुड करणारे आम्ही , त्यावर पारंब्याना झुळणारे आम्ही , अस सर्व आठवलं की त्या झाडाला पडताना जेवढं वाईट नसेल ना वाटलं , तेवढं मला वाटतं …
       खूप झाडं होती तेव्हा पऱ्यापलीकडील काही दिसत न्हवतं आता सर्व आरपार दिसतं , बर इमारती पण दिसतात , कुतूहल अस काही राहील नाही , कचरा टाकण्याची जागा झाली आहे ती , पाणी पण आटत चाललं आहे आता , पाणी नसलं तरी त्या पात्राचा पट्ट्यात गारवा फार बेकार असतो , तिथुन जाताना गाडी भीतीने कधीच नाही पण थंडीमुळे फास्ट मारावी लागते …
         कुतूहल होत लहानपणी ठीक आहे म्हणून हे ,  पण ह्याबाबत काही लिहिताना हा काही लिहण्याचा विषय न्हवे , पण भावनिक गुंतवणूक असेल तर , पण परा हा काय भावनिक गुंतवणूक करण्याचा विषय नाहीय , उकिरड्या सारख आहे ते काहीतरी , मग का लिहावं वाटतं , लहानपणीच कुतूहल अजून डोकावत असेल का की ती भीती अजून मनात असेल , बहुतेक आम्ही मुलींना इम्प्रेस करायला नखभुंग्याची केलेली कत्तल , सोनेरी नखांसाठी ते नखभुंगे आमच्या नावाने शिमगा करत असतील का ….की पकडलेले कबुतर दमा पेशंटना विकले म्हणून ते माझी आठवण काढत असतील की सोडलेले कबुतर मला आशीर्वाद देऊ पाहत असतील , येणं जाणं तिथून होतंच तर मग एकदा थांबावं तिथे नक्की का आज ह्या पऱ्याबद्दल हे सर्व दिव्य आठवलं असेल चिंतन करायला ..??

Comments

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼