विचारांची डिलिव्हरी

 आज उन्हाची तीव्रता जास्त आहे हा युनिफॉर्म कालच धुतला होता पण कितीही धुतला तरी ड्युरेबल आहे ,  त्यामुळे घामाने लतपत झाला तरी आई त्याला सुतासारखा सरळ करेल . त्यात पाठीवरची आयताकृती निर्घृणच म्हणा ,अशी ही सुखवस्तूंनी भरलेली बॅग ...  होय माझी ओळख करून द्यायची विसरलो ,  मी डिलिव्हरी बॉय ,  या इ कॉमर्सच्या झंझावातात एक तीक्ष्ण असा भाला घेऊन उभा असलेला प्यादा . आयुष्य सोपं आहे माझं ,  वेयर हाऊस ते विविध कंपनीज ,  कंपनीज ते ऑफिस  आणि ऑफिस ते लोकांची घरं . तसं बेरोजगारांना इतक्या प्रमाणात रोजगार देणारे एकच सेक्टर असावं ,  अहं मी कोणी क्रांतिकारक विचारांचा डिलिव्हरी बॉय नव्हे ,  एक अल्पशिक्षित कमीत कमी पेपर वाचून विचार करणारा सर्वसामान्यच तसा. बस बागेतून सुखवस्तू हातात येण्यासाठी ही सारी फरफट चालू असते , आता तुम्ही म्हणाल की पोटासाठी करतो ,  पण माणूस तर उपभोगासाठी जास्तीत जास्त मेहनत करतो ना,  भविष्य सिक्युअर करण्यासाठी  आणि तसं पण बाजारातल्या सुखवस्तूंची लालसा कुणा सर्वसामान्य माणसाला होऊ नये बरं?
        मला माझ्या कामाचा पहिला दिवस आठवतो , ८० ते ९० किलोमीटरचा प्रवास ,  वजन जवळजवळ नऊ ते दहा किलो. फारच धांदळ उडाली माझी तरीदेखील दहा-बारा डिलिव्हरी पोहोचवल्या ,  पहिल्याच दिवशी आपला अंदाज आला म्हणून मी खुश होतो पण इतर सहकाऱ्यांच्याकडे पाहून मी म्हंटलं , "ये तो बस ट्रेलर है"!!  काही का असेना आयुष्य अलिप्त राहण्यातच गेले आहे ,  घरात मी सुरक्षित फील करतो., ह्या प्रोफाइल मुळे मला नवीन माणसं तरी मिळतात. वस्तू हातात आली की आनंद सोहळे , कुटुंबाची उत्सुकता तर कोणाचा हिरमोड देखील होतो. काही जणं प्रश्न देखील विचारतात काही माझ्यासारखे चेहरे पाडतात , तेव्हा मी आपला माझा पुढचा मार्ग पकडतो. काय करू शकतो? रिटर्न कर एवढेच सांगू शकतो ना मी!  सुखाच्या आणि दुःखाच्या व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलतात हे मी पाहिलं आहे , कुणाचा आनंद पैसे खर्च करून निघतो तर कोणाचा राग देखील.  मला नेहमी कौतुक वाटतं या साऱ्याचं आत्मिक सुख काही दिवस का होईना लोकं मिळवतात. वस्तू सोबत रिलेट होतात काही  वेळा तर काही लोक अगदी मृत्यूपर्यंत जपून ठेवतात  अशा जपून ठेवलेल्या वस्तू भविष्यात अँटिक तर होत नसतील ,  जमिनीत गुड्डूप होऊन नवीन उदयास आलेल्या संस्कृतीला तर मिळत नसतील....?  अभ्यास करतात वस्तूंचा आणि संस्कृतीचा वेध घेतात,  तत्कालीन मनोरंजनाच्या साधनांचा , आर्थिक परिस्थितीचा , सामाजिक व धार्मिक रूढींचा ,  व्यापाराचा सगळ्याचाच. एकंदरीत भावनेशी निगडित गोष्टी   इतक्या झिरपत जातात कारण त्यावर लावलेला जीव हा मातीमोल ठरावा आणि पुन्हा उदयास यावा एक नवीन ओळख म्हणून...
      मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातलाच आहे ,  लहानपणापासून फार छोटी स्वप्न पाहिली आहेत पण ती स्वप्न अजाणतेपणे होईना जाणतेपणी का होईना पूर्ण झालीत ,  मला माझं काम आवडतं आणि मी या कामात आनंदी आहे याचा मला फार अभिमान आहे , आता तुम्ही म्हणाल की हा मुलगा तर अल्पसंतुष्ट  आहे पण तसं नाही संतुष्टीच्या व्याख्या आपण कोण ठरवणार? भौतिक गोष्टींची मिळकत म्हणजे जर संपत्ती असेल तर ती संपत्ती आज ना उद्या मिळवू शकतो..! तस पाहिलं तर सगळं स्पष्ट होतंय भौतिक गोष्टी समाधानाची क्षणिक किंवा काही काळापर्यंत शाश्वती देत आहेत असं माझं समज झाला आहे पण का होऊ नये असा समज , मी रोज पाहत आहे त्याच त्याच व्यक्ती पुन्हा पुन्हा विविध गोष्टी मागवत आहेत काही गरजेच्या काही विनाकारण , मुळात आजकाल समाधानी कोण आहे पण काही काळाचे समाधान ह्या धकाधकीत मिळत असेल तर त्याला का मुकायच , पैसाचे मूल्य आज कमी उद्या जास्त होतंच राहणार आहे , मौद्रीक धोरणं चालत राहणार आहेत , आपण बचत करायची की उधळपट्टी हे देखील आपण ठरवत नसतो , आपण कधी कर्जे घ्यायची आणि कमी व्याजाचे आकडे कधी आपल्याला लालला देतील हे देखील नीट सांगता येत नाही आणि जसं मी म्हणालो मी देखील एक प्यादा आहे तसेच हे सगळे देखील आहेत , मग त्या प्याद्याना जर माहीतच नसेल आपण कुणाची मालकी आहोत तर खर्चाची मुभा तरी त्यांना मिळावी , कारण बचत तत्कालीन सुख तर मिळवून देणार नाही …. 
      स्वतः सोबत वार्तालाप करणं चर्चा करणं  फार सुखद आहे असतं.  कामाच्या व्यापात आपण स्वतः सोबत बोलणं विसरून जातो स्वतःला पाहणं विसरून जातो ,  मनातले विचार जर  हवेत तरंगून लोकांपर्यंत पोचले असते लोकांच्या कानी पडले असते  तर किती बर झाल असतं .₹ त्या दिवशी देखील असाच बसलो त्या झाडाखाली फार थकवा होता , बऱ्याच वेळा मी एकटा असल्याने फार छान संभाषण चालू असत माझं आणि माझ्या मनाचं आज देखील बराच वेळ झालं मी हे विचारचक्र फिरवत फिरवत जवळ जवळ अर्धा पाऊण तास घालवला आहे , मी हा माझ्या सोबत केलेला वार्तालाप या थोड्याशा वेळात मला आनंद देऊन जातोय पण आज माझ्याकडे वेळ आहे जरा लवकर घरी जाईन म्हणतोय , बाकी अलबेल ...!!

अजिंक्य रोकडे
        

मी संपादित केलेला पहिला दिवाळी अंक जरूर वाचा💛🌼


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼