आमच्या बाळाचा पहिला प्रवास..


आमच्या बाळाचा पहिला प्रवास.....

चिपळूणच्या पुराने आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागृतता आवश्यक असल्याचे अधोरेखित केले आहे. यासाठी खूप काही अभ्यासिकाची आवश्यकता नाही. आपल्या दैनंदिन व्यवहारातील छोट्या छोट्या बाबींचा बारकाईने विचार केला तरी खूप आहे. फक्त आपत्ती कडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन महत्वाचा आहे. मी आणि माझी पत्नी पायल आम्हाला आलेला अनुभव.
आमच्या बाळाच्या जन्माची संभाव्य तारीख होती २० जुलै. पावसाचे दिवस असल्याने सहाजिकच काळजी वाटत होती. आपली वेळेला घाई गडबड होऊ नये म्हणून हॉस्पिटलला जाताना लागणारी बॅग पायलने एक महिना आगोदर भरून ठेवली होती. आठवेल तसं आणि परिस्थिती कशी असू शकते याचा विचार करून त्यात वस्तू भरत होती. सीझर झालं तर पाच सहा दिवस राहण्याची तयारी, वगैरे. 

*सुवर्ण क्षण आणि यक्ष परीक्षा*
आमच्या बाळाचा जन्म २० जुलै ला सुश्रुषा हॉस्पिटल, चिंचनाका, चिपळूण येथे झाला, फार मोठा आनंदाचा क्षण, त्यामध्ये दिवस आषाढी एकादशीचा, कोणत्याही मराठी व्यक्तीसाठी यापेक्षा विशेष दिवस तो कोणता! सम्पूर्ण दिवस शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. सामान्य प्रसुती झाली आणि दोघेही सुखरूप याचे खूप समाधान होते. दुसऱ्या दिवशी २१ तारखेला घरी जाण्यासाठी डॉक्टर मॅडमनी हिरवा कंदीलही दाखवला आणि बाळाचं स्वागत करण्यासाठी घरी लगबग सुरू झाली. यासाठी पायलची आई बाळासोबत हॉस्पिटलमध्ये होती, त्यांना शिरगावला घरी पाठवले. दुपारी घरी जायचे निश्चित झाले होते, तेवढ्यात पायलचा ब्लड रिपोर्ट आला त्यात हिमोग्लोबिन प्रमाण खूप कमी झालेले आढळले, डॉक्टर मॅडमनी दुपारी लगेच व रात्री एकदा सलाईन लावावे लागेल असे सांगितले आणि बाळाचं घरी जाणं एक दिवसाने वाढलं. सकाळी जायचं आहे म्हणून मी एकटाच बाळ आणि पायलसोबत राहतो तुम्ही घरी तयारी करा असं मी घरी सांगितलं. संध्याकाळी ८ वाजता रक्त तपासणीचे पैसे देण्यासाठी खाली गेलो, तेवढ्यात पैसे सुटे नसल्याने सकाळी निघताना बाळासाठी लागणारे जे समान घेणार होतो ते राजाभाऊ माटे यांच्या औषध दुकानात तेव्हाच घेतलं आणि सहज चर्चा रंगली, पावसाचा जोर वाढत होता मी पाणी कुठपर्यंत भरते म्हणून सहज विचारलं, समोर पार्किंगमध्ये माझी कार होती, पाऊस वाढला तर गाडीला पाणी लागेलच असा अंदाज आला. पुन्हा हॉस्पिटल रूममध्ये आलो, नातेवाईकांनी जेवण आणलेलं ते झालं, आमचं दोघांचं सकाळचं नियोजन सुरू झालं. चर्चे अंती ठरलं गाडी कावीळतळी भागात पायलचे एक नातेवाईक राहतात त्यांच्या अपार्टमेंटमध्ये ठेऊन येतो. गाडी ठेवण्यासाठी गेलो तेव्हा तेही 'चिपळूणच्या पाण्याला घाबरलास का?' म्हणून विनोदाने माझी टेर खेचत होते. तसाच खेळीमेळीच्या वातावरणात मी हॉस्पिटलमध्ये आलो. 
बाळासोबत पहिल्यांदाच निवांत वेळ घालवत होतो. त्याचा तो इवलासा स्पर्श वगैरे सर्व काही विलक्षण होतं आम्हादोघांसाठी.
आईचे दूध पुरत नसल्याने पावडरचे दूध द्यावं लागतं होतं. दोघेही आई बाबा झाल्याचा आनंद घेत होतो. दोन वर्षांपूर्वी माझ्या बहिणीच्या मुलावेळी माझी आणि पायलची प्रॅक्टीस झाली होती बाळाला हाताळण्याची आणि तसही माझं ते आवडत काम. पायल थकली होती. तिला झोपायला सांगितले. रात्री ११ नन्तर पावसाचा जोर वाढू लागला. पाणी भरणार याची मला खात्री पटली होती पण सकाळी आपण निघेपर्यंत ओसरेलच असा अंदाज पण होता. अधून मधून खिडकी थोडी सरकवून मी पाणी पातळी बघत होतो. झोप काही लागत नव्हती बाळाचा थोडा जरी आवाज झाला तरी जाग येत होती, दुध बनवण्याचा आणि  पाजण्याचा कार्यक्रम सुरूच होताच ठराविक वेळेने. रात्री ०३ वाजता हॉस्पिटल स्टाफने दरवाजा ठोठावला, गाडी असेल तर योग्य ठिकाणी हलवा अशी सूचना दिल्या, बाहेर आमच्यासारखे अजून तीन परिवार होते. त्याच्या दुचाकी हॉस्पिटलच्या आतमध्ये म्हणजे तळमजल्यावरच्या ऑफिसमध्ये आणल्या होत्या. सकाळी ०४ वाजता इन्व्हर्टरपर्यंत पाणी आल्यामुळे सम्पूर्ण वीज खंडित झाली. मोबाईल टॉर्चवर सकाळी उजाडन्यापर्यंत बाळाला पाजता आलं. सकाळी ०८ वाजता जाणवू लागलं की दुपारपर्यंत तरी आपण घरी जाऊ शकणार नाही. हॉस्पिटलमध्ये तळमजल्यावर मॅडमचे ऑफिस, पहिल्या मजल्यावर ऑपेशन थिएटर आणि रुग्णांसाठी रुम, दुसऱ्या मजल्यावर डॉक्टर स्वतः परिवारासह राहत होत्या. सकाळी ११ पर्यंत चिपळूण मधील नातेवाईकांचे फोन आले तेव्हा २००५ ची पाण्याची पातळी ओलांडली होती. घरी फोन लागत नव्हते 'आम्ही सुखरूप आहोत, पाणी वाढलंच तर दुसऱ्या मजल्यावर जाऊ शकतो' असा शेवटचा टेक्स्ट मेसेज घरी पाठवला. त्यांनतर सर्व मोबाईल नेटवर्क बंद झाले होते. दुपारी डॉक्टर मॅडमनी सर्वांना भात वरण खाऊ घातलं. पिण्याच्या पाण्याची कमतरता होती कारण RO बंद होते, आमच्या जवळ एक पाणी बाटली होती. खाली मेडिकल मधल्या पाणी बाटल्या पुराच्या पाण्यात गेल्या होत्या. तळ मजला पूर्ण पाण्यात होता, पाणी जिन्याच्या पायऱ्या एक एक करून पार करत होत्या.
दुपारी विचार करत बसलो तेवढ्यात आठवलं, रात्री वीज नाही, मोबाईल चार्जिंग नाही मग बाळाला भरवायच कसं ? विचारानेच मन सुन्न झालं. मॅडमना त्याची कल्पना दिली. उजेड असतानाच त्यांनी ७ वाजता पुन्हा सगळ्यांना भात वरण दिलं. इतर तीन पैकी दोन महिलांचे सीझर झाले होते त्यांना तेवढं जेवण पुरेसे नव्हते, आमच्याकडे खूप नातेवाईकांनि खाण्यासाठी आणलेले लाडू वगैरे होते ते त्यांना दिले. मॅडमनी एक एक मेणबत्ती सगळ्या रूममध्ये दिली, पण माचीस फक्त आमच्याकडे होते. जे पायलने एक महिना आधी भरले होते, पण मेणबत्ती विसरली. संध्याकाळी ०७:३० वाजता काळोख होऊ लागला, आपण किती हतबल आहोत याची जाणीव होऊ लागली. एका मेणबत्तीमध्ये रात्रभर दर दोन तासांनी दूध तयार करून पाजणे शक्य नव्हतं. आई बाबा म्हणून बाळाच्या जन्माच्या दुसऱ्याच रात्री आमची परीक्षा होती. आपल्याला रात्र कशी काढायची आहे ते  पायलचं आणि माझं ठरलं, बाळ रडले तरच मेणबत्ती पेटवायची आणि दूध पाजयचे. ०८ वाजल्या नंतर डोळे बंद केल्यावर काळोख दिसतो अशा काळोखात बाळाला घेऊन आम्ही बेडवर बसलो होतो. सुदैवाने आईच्या दुधाने बाळाची भूक पूर्ण होत होती, दूध बनवून देण्याची गरज भासत नव्हती. बाळ कुरकुरले की लगेच मेणबत्ती पेटवायची दुधाला घेयचं किंवा शुचे कपडे बदलायचे आणि एकमेकांकडे बघून, मन घट्ट करून पुन्हा मेणबत्ती विझवायची हा क्रम चालू होता. रात्री २ वाजता पुराच्या पाण्याने सर्वोच्च पातळी गाठली होती. आता आमच्या मजल्यावर पाणी येण्यासाठी केवळ दिड पायरी शिल्लक होती. ती पार झाली तर डॉक्टरांच्या घरी जाण्यावाचून पर्याय नव्हता. सगळे रुग्ण नातेवाईक, स्टाफ धरून एकूण १३ जणांना एकत्र राहावं लागणार होतं. त्यावेळी पूर असला तरी कोविडची देखील भीती होतीच. त्यात आमची एक दिवसांची बाळ.  पण पाणी तेवढ्यावरच स्थिरावले. तळमजल्यावर ठवलेल्या दुचाकी पाण्यात बुडल्यामुळे पेट्रोलचा भयानक वास सम्पूर्ण हॉस्पिटलमध्ये पसरला होता. घसा खवखवायला लागला होता. बाळ पण अधून मधून शिंकायचे तेव्हा धडकी भरायची, कारण आता पुढचे काही दिवस तरी बालरोग तज्ञ मिळणार नाही याची खात्री होती. अखेर ४ वाजता मेणबत्तीने साथ सोडली, आता यापुढे जे काही करायचे ते होते केवळ अंदाजानेच, पण पायल एव्हाना मनाने तयार झाली होती. हे सगळं संपणार कधी याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. काळोखात बाळाच्या जवळपास आम्ही दोघेही हाथ फिरवत डास आणि पाखरं जवळपास नाहीत याची  खात्री करत होतो. सकाळी ०६:३० वाजता पाऊस थांबला होता पाणी ओसरू लागले होते. तळमजल्यावर गुडघ्यापर्यंत चिखल होता. आम्ही सर्व पुरुष, स्टाफमधील मुली आणि डॉक्टरमॅडम सर्वांनी चिखल काढायला सुरवात केली. ८ वाजताच्या सुमारास स्टेट बँक समोरील रोडवर एक व्यक्ती छाती पर्यंतच्या पाण्यातून जाताना दिसली, लगेचच मी वर रुममध्ये आलो. मी काविळतळीमध्ये गाडीची अवस्था काय आहे ती पाहतो, नाहीतर पर्यायी व्यवस्था करतो असे पायलला सांगितले. माझ्या जाण्यामध्ये रिस्क होती, कारण पाऊस वाढला तर पाणी पुन्हा वाढण्याची भीती होती. पण जाणं गरजेचं होतच कारण बाळंत स्त्रीसाठी सुरवातीच्या दिवसांचा आहार व्यवस्थित होणं गरजेचं होतं आणि पुन्हा ११ वाजता धरणामधून पाणी सोडण्याची शक्यता होती. शिवाय अजून एक काळोखी रात्र बाळाला देऊ इच्छित नव्हतो. त्यामुळे किमान चिंचनाका भाग सोडणे तरी गरजेचे वाटत होते. पुढे घराकडे कसंही जाऊ शकत होतो. माझा मोबाईल बंद झाला होता, पायलचा ८% बॅटरी शिल्लक होता. आम्ही बसून एका कागदावर अशा व्यक्तींचे मोबाईल नंबर लिहून काढले जे एका मेसेजवर इथे आपल्याला घेऊन जाण्यासाठी येऊ शकतात. त्यात ८ ते १० रोटेरिअन आणि रोट्रॅक्टर होते. मी सकाळी ०८:३० वाजता बाहेर पडलो. चप्पल वाहून गेली होती, मुख्य रस्त्यावर पाणी माझ्या कमरेपर्यंत होते, थोडाच पुढे आलो तर श्री हॉस्पिटलमधील कोविड रुग्ण खिडकीमधून पिण्यासाठी पाणी द्या आम्ही दोन दिवस उपाशी आहोत अशी विनवणी करत होते, आपण काही करू शकत नसल्याचे मला खूप वाईट वाटले. मध्येच पाण्याचा जोराचा प्रवाह जाणवायचा, मेहता पेट्रोल पम्प मार्कंडी येथ पाणी होत. तिथे खूप गर्दी जमलेली, तिथे एक ग्रुप पाणी वाटप करत होता, अगदी उच्चभ्रू व्यक्ती देखील पाण्यासाठी झुंबड लावताना दिसली. त्या ग्रूपमधील एकाला श्री हॉस्पिटलमध्ये मदत पाहिजे असल्याचे सांगितले आणि मी धावत कावीळतळीकडे सुटलो कारण मोठा पाऊस सुरू झाला होता. साई मंदिर पर्यंत पोहोचलो तोच मागून एक दुचाकी घेऊन हेल्मेट आणि रेनकोट घातलेली व्यक्ती आली. मी हात केला तोही थांबला, गाडीवर बसल्यावर समजले की मी ज्यांच्याकडे  गाडी ठेवली होती त्यांच्याकडेच ते कामाला आहेत, हा निव्वळ योगायोग. गाडीजवळ गेलो तर बाजूची गाडीवाला त्याची गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करीत होता, ते चित्र पाहून माझं पण अवसान ढळत चाललेलं. गाडीचा निम्यापर्यंत म्हणजे सीट पर्यंत पाणी येऊन गेल्याच्या खुणा दिसत होत्या. बोनेत उघडून पाहिलं तर दोन भले मोठे उंदीर, त्यांना कसंबसं बाहेर काढलं. सगळीकडे फिरून पाहिलं तर गाडीच्या सायलेंसरला कुणीतरी बटाटा लावून ठेवला होता. तोही अगदी व्यवस्थित. तो काढला आणि गाडी चालू केली आणि गाडी चालू झाली, आजूबाजूचे पण सगळे चकीत झाले. लागलीच गाडी घेऊन चिंचनाक्याकडे निघालो, पाणी आता घाणेकर हॉस्पिटल पर्यंत कमी झालेलं. गाडी तिथेच ठेवली एक व्यक्ती तिथे उभी होती, मी गाडी चालवता येते का विचारलं, तो हो म्हणाला मी चावी त्याच्याकडे दिली आणि सांगितलं माझं बाळ पलीकडे अडकलंय मी घेऊन येतो, पाणी वाढलं किंवा ट्राफिक ला अडचण झाली तर गाडी हलवा. मी पाण्याच्या दिशेने निघालो पण आता पोलीस सोडेना, खूप विनवणी केली सगळं सांगितल मग सोडलं, पुढे नेमकी एक बोट भेटली त्यांना बाळाला आणण्याबद्दल सांगितलं. त्यांनी त्यांची अडचण सांगितली बोट अनंत आईस फॅक्टरीपर्यंतच जाऊ शकणार होती. मी हॉस्पिटलमध्ये पोहचलो मॅडमना आम्ही निघाल्याचे सांगितले. आता खरी कसरत होती कारण पायात चप्पल नव्हती बाळाला घेऊन निसरड्या वाटेवरून बोटी पर्यंत जायचं होतं. स्टाफच्या दोन महिलांनी पायलला दोन्ही बाजूने घट्ट पकडले आणि सांगितले तुम्ही फक्त बाळाला संभाळा आम्ही काहीही झालं तरी तुम्हाला पडू देणार नाही. मांडीपर्यंतच्या पाण्यातून स्टेट बँक ते अनंत आईस फॅक्टरी ५० मीटर अंतर मला पाच किलोमीटर प्रमाणे वाटत होते. शेवटी बोटी पर्यंत पोहोचलो. आणि आमच्या बाळाचा पहिला प्रवास सुरु झाला तोही बोटीने. घाणेकर हॉस्पिटलला उतरल्यानन्तर त्या व्यक्तीने गाडी तयार ठेवली होती, तदपूर्वी गादीपर्यंत पोचेपर्यंत दोघातिघांनी कुठे सोडू का? याबद्दल विचारणा केली, हे खूप समाधान कारक होतं. शेवटी गाडी घराकडे निघाली. आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता, बाळाने या दोन दिवसात खूप साथ दिली होती. शिरगावच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो तिथे पोलीस चिपळूणकडे जाण्यासाठी कोणाला सोडत नसल्यामुळे नातेवाईक मित्र कासावीस होऊन वाट पाहत होते तर काही पोलिसांसोबत हुज्जत घालत होते. आम्हाला चिखलात माखलेले आणि बाळाला पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. घरी पोचल्यावर तर आषाढी एकादशीचा विठ्ठल आल्याची भावना वयस्क मंडळीची होती. 

*आयुष्यात हितचिंतक कमावणे महत्वाचे*
शान्त विचार केल्यावर लक्षात येते आपल्या पाठीशी खूप हितचिंतकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा होत्या म्हणूनच एवढे योगायोग अनुभवायला मिळाले. जसे की सासूबाईंच्या ऐवजी माझे तिथे राहणे, बाळाच्या आवश्यक वस्तू मी आधीच घेणे, बाळाला आईचे दूध पुरेसे होणे, आमच्या सामानामध्ये माचीस असणे बाळाचे पुरेसे कपडे असणे, गाडीच्या सायलेंसरमध्ये अनोळखी व्यक्तीने बटाटा लावल्याने गाडी सुस्थितीमध्ये राहणे, बाळाला घेऊन जाण्यासाठी बोट उपलब्ध होणे हे आणि असे खूप काही. 

सरते शेवटी *'ही वेळ का आली?'*  हा आपल्या निसर्गाने जो मोठा प्रश्न उपस्थित केलाय त्यावर आता काम करायचे आहे. 

लेखक - रोहन नलावडे - पायल नलावडे


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼