एक मोकळं माळरान आहे आणि मध्ये एकटंच झाड उभं आहे, पाठीमागे सूर्य मावळतोय, मस्त छटा दिसत आहेत, काही ढग काळे आहेत, काहींना सोनेरी कडा आहे. खाली जमीन तांबडी, तडे गेलेली. वाळलेल्या काड्या, जमवली तर फाटी जमतील गोयलाभर . सगळं शांत. पण त्या शांततेत एक कोलाहल पण जाणवतो आजकाल.... हुबेहूब वाटावं असं वातावरण....
आपण जन्माला येतो तेव्हाच पहिली परीक्षा सुरू होत असते, रडलास का नाही? श्वास घेतलास का नाही? वजन किती? पहिल्या दिवसापासून आपल्याला मोजलं जातं, तोललं जातं. मग शाळा सुरू होते. पाटी-पेन्सिल, दप्तराचं ओझं, आणि मार्कांचं टेन्शन. दहावी म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट. बारावी म्हणजे करिअरचा पाया. CET, नोकरीसाठी इंटरव्ह्यू, पैसे, व्यापार....पेपर संपतच नाहीत, आयुष्याचा पेपर कधी पुढे पुढे सरकत जातो समजतच नाही...
पण खरं सांगू? हे सगळे पेपर सोपे होते. कारण त्यात प्रश्न छापलेले असायचे. चार पर्याय असायचे. वेळ ठरलेली असायची. पास-नापासचा निकाल ठरलेला असायचा. पण इतर बितर चे प्रश्न आपण दूर लोटत जातो आणि खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा उत्तरपत्रिका नसते. जेव्हा प्रश्न विचारणारं कोणी नसतं, पण उत्तर द्यावंच लागतं सगळ्यांना एक एकाला....आणि
या परीक्षेला सिलॅबस नसतो. गाईड नसतो. कॉपी करायला जागा नसते. इथं प्रत्येकाला स्वतःचं उत्तर लिहावं लागतं. स्वतःच्या अक्षरात ह्यात ना अलंकार वापरता येतात ना कोणती शैली, ना इंटरनेट, ना कोणता सॉफ्टवेअर, अनुभवूनच ती उत्तरं सोडवावी लागतात....
स्वप्नं बघायला पैसे पडत नाहीत. म्हणून तर आपण गरिबीत पण श्रीमंत असतो. कारण स्वप्नं फुकट मिळतात. पण तीच स्वप्नं पूर्ण करायला जाताना खिसा रिकामा होतो.एक भौतिक वस्तू घेतली कि दुसरी खराब दुसरी घेतली कि तिसरी बिनकामी हे चक्र आहे आणि फिरतच राहतं...
केलेलं सगळं आठवतं अभ्यास मेहनत, प्रवास बिनकामाचा कामासाठी ह्या सगळ्यात स्वतःकडे बघायचं राहूनच गेलं, स्वतःची आठवण तेव्हा झाली जेव्हा लोकांच्या चर्चेत आपण नाव होऊ लागलो, नजरेत चर्चेचे बिनकामे झालो....
स्वप्नं म्हणजे काय? ते इंधन आहे. आपल्या जगण्याचं. आपला अभ्यास आणि आपलं असणं, अनुभव आणि घडलेल्या घटना ह्याचा सगळा सार घेऊन पुन्हा समोर दिसणाऱ्या झाडाबद्दल पाहून काहीसं वाटू लागलं, त्याचं पण स्वप्न असेल ना? पाऊस पडावा. पालवी फुटावी. पक्ष्यांनी घरटं बांधावं. फळं यावीत. सावली द्यावी. पण स्वप्नं पूर्ण होण्यासाठी आधी उन्हाळा सहन करावा लागतो. जमीन तापते. पाणी आटतं. पानं गळतात. तरी ते उभं असतं. कारण त्याला माहितेय, एक दिवस पाऊस येणारच.... सगळं अलबेल होईलच ना...
आपण पण तसेच. स्वप्नं जपायची. उन्हात करपलो तरी, पावसात भिजलो तरी. कारण स्वप्नं मेली की माणूस जिवंतपणी मरतो असं बरीच जणं माझ्या वाचणात बोलून गेलीत....
पण मग कधी कधी वाटतं, बस झालं. आता नाही जमत. शरीर थकतं. मन खचतं. पण दुसऱ्या दिवशी परत तेच. अलार्म वाजतो. आपण उठतो. कारण धडपड थांबली की गाडी थांबेल, ह्या झाडाखालची जमीनीला भेगा पडल्यात. गवत नाही. पाणी नाही. तरी त्या झाडाने मुळं सोडली नाहीत. त्याची धडपड सुरू आहे. जमिनीत खोलवर पाणी शोधतेय. ऊन जास्त झालं तर पानं कमी करेल, पण जगणं सोडणार नाही.आपली पण तशीच धडपड. कधी पगार वाढत नाही म्हणून साईड बिझनेस करतो. कधी नोकरी जातेय म्हणून नवीन कोर्स करतो. कधी पैसे कमी पडतात म्हणून जुळवाजुळव करतो. पण थांबत नाही. कारण थांबलो तर संपलो. ही जी धडपड ही शिक्षा नाही. ती आपली पूजा आहे, स्वप्नांसाठी केलेली....सूर्य मावळतोय . पण किती सुंदर दिसतोय. दिवसभर तापला. घाम काढला. पण जाताना पण रंग उधळून जातोय. सोनेरी, केशरी, गुलाबी. ढगांना पण रंग लावून जातोय.आपलं आयुष्य पण तसंच असावं. दिवसभर कष्ट करायचे. घाम गाळायचा. पण संध्याकाळी मागे वळून बघितलं तर समाधान वाटलं पाहिजे. "हो, जगलो. लढलो. काहीतरी कमावलं."
जीवनात काळे ढग येतात. संकटं येतात,आजारपण येतं. माणसं दुरावतात. पैसा पुरत नाही. पण त्या काळ्या ढगांना पण सोनेरी कडा असते. संकटातून मार्ग निघतो. पण एकटं आहे म्हणून कमजोर नाही. उलट, सगळ्या वादळांना एकट्याने तोंड दिलंय त्याने. त्याची सावली कदाचित छोटी असेल, पण ती त्याची स्वतःची आहे. त्याच्या कष्टाची आहे.
आपण पण कधी कधी एकटे पडतो. स्पर्धा आहे. राजकारण आहे.कामावर , नातेवाईकात, मित्रात. सगळीकडे. पण एकटं पडलो म्हणून घाबरायचं नाही. कारण एकटं झाडच सगळ्यात उंच वाढतं. त्याला कोणाचा आधार नसतो. तो स्वतःच्या जीवावर उभा असतो.
परीक्षा संपत नाही. स्वप्नं दिसणं थांबत नाही. धडपड रोजचीच. जीवन असंच. कधी ऊन, कधी सावली. कधी पूर, कधी दुष्काळ...
पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची.झाड मेलं नाही. ते अजून उभं आहे. वाळलेल्या जमिनीत, तुटक्या काठ्या बाजूला पडल्या असल्या तरी त्याने आशा सोडली नाही....आपण पण सोडायची नाही. स्वप्न भंगलं तरी नवीन बघायचं. धडपडून पडलो तरी उठून चालायचं. कारण जीवन ही एकच परीक्षा आहे जी आपण रोज देतो. आणि या परीक्षेत पास होण्याचा एकच मार्ग - शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहायचं. सूर्य मावळला तरी उद्या परत उगवणारच. रात्र कितीही काळी असली तरी पहाट होणारच. झाडाची पानं गळली तरी नवीन पालवी फुटणारच आणि आपण? आपण पण परत उभं राहणार. नवीन स्वप्न घेऊन. नवीन धडपड करायला. नवीन परीक्षा द्यायला.
कारण दुःख असलं, वेदना असल्या, अपयश आलं तरी सांगायचं - बाकी अलबेल आहे.
जगायचं. लढायचं. जिंकायचं.
इतकंच.
बाकी अलबेल 🩵
- अजिंक्य रोकडे (देवा)
Comments
Post a Comment