अनामिक🌼

     त्यादिवशी नाक्यात गेलेलो , फॉर्म भरला , ५००० जागा आणि एक माझी पोस्ट ह्या आशेवर , ओबीसीला ह्यावेळी जोराच माप मिळालं म्हणावं , सकाळपासून आहे इथेच भूक अनावर होत होती , वडापाव खात होतो पण कोणीतरी ओळखीचं आजू बाजूने जातच असत पण काही वेळा वेगळे भास होतात , तस पण सगळे हवं हवं असणार दृश्य शोधत असतात , मी कॉलेज वरून , कामावरून येणाऱ्या , मुली ,  स्त्रिया दिसतात का पाहायला नजर इकडे तिकडे केली , हो म्हणूनच , एक मुलगी जणू एवढ्या पावसात पण पाय घाण न होता चालत होती  , माझी नजर तिच्या पायांवर गेली , पैंजण होतं , पदवी शिक्षण झालं असेल , माझ्या वयाची आहे , पाय गोरे आहेत , सुंदर असणार , इतक्या अलगद कश्या चालू शकतात ह्या मुली , मला तर पाय साफ ठेऊन गाडी पण चालवता येत नाही , जन्मतः मुली अश्याच असतात का , किती काळजी घेतात स्वतःची , मी वर पाहिलं तर आखीव रेखीव शरीर , चेहरा गोलच , हो गोलच होता , एकंदरीत केस पण छान होती , मला छोटी केस आवडत नाहीत आणि आवडली तर पूर्ण बोबकट असावा , डोळे तिच्यावर स्थिर केले आणि तिने पण माझ्याकडे पाहिलं , मी चावा घेतला वड्यावर आणि नेमकं तेव्हाच हिने मला पहावं , कस वाटलं असेल तिला , ती गेली , पाहत बसलो , एरवी वेळेवर न येणाऱ्या महामंडळाच्या गाड्या आज मात्र वेळेवर येऊ पाहत होत्या , ती गाडीत बसली , गाडी जाईपर्यंत पाहत बसलो , शेवटचा घास आनंदाने खाऊ म्हणलं तर मिरची दाताखाली आली , खूप पाणी प्यायलो …..
      मला तुम बिन २ आवडलेला , खरच आवडलेला , त्यातलं कोणतंही गाणं मी ऐकायचा मूडला आलेलो , मी आठवू लागलो काहीतरी कनेक्शन आहे राव ….!!! 

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

        घरी आल्यावर समजलं आपण भिजलो आहोत , रेनकोटच्या चैनीतून पाणी आतमध्ये येतच कस , शरीराची एक लाईन पूर्ण भिजली , मुळात रेनकोट घालवाच का मग ? मूळ उद्देशच जर गंडत असेल तर काय फायदा ? शेवटी टॉवेलने अंग सहज पुसलं जातं , पण केस लगेच सुकत नाहीत , ओलावा राहतो  डोक्याचा स्किनवर…. रेनकोट कोकणच्या पावसात फसतो …!!! चुलीजवळ जाऊन ऊब मिळतेय पण थोड्या वेळाने त्याचे पण चटके लागतात …. अंधार पडला , जेवलो आणि गादी अंथरली , आजकाल व्हाट्सएपचे मेसेज बाहेर दिसत का नाही मला , आधी कॉलेजला असताना मोबाईलच्या हर एक सेटिंग करता येत होत्या मला आता का जमत नाहीत ? का मला करायला कंटाळा येतो ? की संयम उरला नाही ? एक अनोळखी नंबर आणि हाय , तोच चेहरा , तोच फील , तीच नजर …. स्वप्नात आहे का नाही हा विचार करण्याची आता हिम्मत होत नाही बहुतेक , नक्कीच हे खरं असणार , ओळखीच्या आणि वेळेच्या कचाट्यात चेहरे विसरलेलो आपण , कॉलेजमध्ये एका वर्गातले , बोलण्यात एवढं समजलं आपल्याला जे हिरोईक वाटतं कॉलेज मध्ये ते मुलींना छपरी वाटायचं , पण मी तसा नसतो तर आज दखल घेतली असती का ? पण मी आता तसा नाहीय म्हणून हे सारं ….
      कामाला जाऊन तिच्या बोलण्यात जबाबदारी , मी अजून अलबेल , ती वेळ घालवू पाहे तर मी कमिटमेंटसाठी हावरा , मुली नेहमी ब्यालन्स्ड कश्या वागू शकतात , दुसर्याबद्दल मोह वाटावा अस काहीच बोलण्यात दिसू देत नाहीत , आपण जाम विचार करतो , लगेच घोडे पळवू लागतो …..
      आपल्या सोबत शिकलेल कोणीतरी अस अचानक आपल्याला कस सुंदर वाटू लागतं काही वर्षांनी , ती व्यक्ती कामाला जाते म्हणून जेलसी वाटते का हेवा वाटतो , जबाबदाऱ्या पार पडणारे सेटल वाटतात आजकाल , अभ्यास असा काय असतो , निकाल पैसानेच लागतात आजकाल , पण आजचा दिवस फार छान होता , बरेच दिवसांनी कोणासोबत तरी बोलणं झालं , कुणीतरी आपली दखल घेतंय तर … हे सगळं विचारचक्र थांबवू पाहत आहे , गाणी हा एकच पर्याय आहे …..
       सकाळी गादीवर ऊब लागत होती , लेट जाग यायला लागली , बाहेर ऊन पडलं आणि आतमध्ये लादिला पाणी सुटू लागलं , माझा एक पाय लादिवर जाऊन मला कालचा पाऊस आठवू लागला , बंद डोळ्यांना दृश्य दिसू लागली , तो चिखल आणि त्यातून सहजतेने चालणारी ती पावलं…. दचकन उठलो , डोळे चोळले आणि मोबाईल पाहिला …काहीच नाही….!!!

*अजिंक्य रोकडे*

#बाकीअलबेल
 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्ल्यूटो🌼

आता सोड ना कविता 🌼

माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते 💰