काम करताना केवळ विद्यार्थ्यांना शिकवणे एवढीच आपली जबाबदारी नसते; तर स्वतःच्या आयुष्यातील अनेक चढ-उतारांमधून शिकत राहणेही तितकेच महत्त्वाचे असते. अलीकडे महात्मा गांधीजींचे ‘सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा’ हे पुस्तक वाचण्याचा योग आला. हे पुस्तक वाचताना गांधीजींच्या आयुष्यातील प्रसंग आणि माझ्या शिक्षक प्रवासातील काही अनुभव यांच्यामध्ये एक वेगळे नाते जाणवले. आपण एखादे काम मनापासून करत असतो, काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करत असतो; पण प्रत्येक वेळी आपल्या प्रयत्नांचे कौतुक होईलच असे नाही. उलट, आपल्या आजूबाजूला आपल्या प्रगतीकडे असूयेने पाहणारी माणसेही असतात. कधी आपल्या प्रयत्नांवर प्रश्न उपस्थित केले जातात, कधी गैरसमज निर्माण होतात, तर कधी आपण केलेल्या चांगल्या कामाची दखलही घेतली जात नाही. अशा वेळी मनात निराशा निर्माण होणे स्वाभाविक आहे. अधांतरी काम करताना या गोष्टींचा अनुभव अधिक प्रकर्षाने येतो. मर्यादित साधने, अनेक जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि त्याचबरोबर स्वतःच्या आयुष्यातील ध्येय, या सगळ्यांचा समतोल साधत पुढे जाणे ही एक प्रकारची रोजची परीक्षा असते. कधी कधी आपण एखाद्या कामासाठी खूप प्...