Skip to main content

सत्याचे प्रयोग आणि मी 🌱

काम करताना केवळ विद्यार्थ्यांना शिकवणे एवढीच आपली जबाबदारी नसते; तर स्वतःच्या आयुष्यातील अनेक चढ-उतारांमधून शिकत राहणेही तितकेच महत्त्वाचे असते. अलीकडे महात्मा गांधीजींचे ‘सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा’ हे पुस्तक वाचण्याचा योग आला. हे पुस्तक वाचताना गांधीजींच्या आयुष्यातील प्रसंग आणि माझ्या शिक्षक प्रवासातील काही अनुभव यांच्यामध्ये एक वेगळे नाते जाणवले.
आपण एखादे काम मनापासून करत असतो, काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करत असतो; पण प्रत्येक वेळी आपल्या प्रयत्नांचे कौतुक होईलच असे नाही. उलट, आपल्या आजूबाजूला आपल्या प्रगतीकडे असूयेने पाहणारी माणसेही असतात. कधी आपल्या प्रयत्नांवर प्रश्न उपस्थित केले जातात, कधी गैरसमज निर्माण होतात, तर कधी आपण केलेल्या चांगल्या कामाची दखलही घेतली जात नाही. अशा वेळी मनात निराशा निर्माण होणे स्वाभाविक आहे.
अधांतरी काम करताना या गोष्टींचा अनुभव अधिक प्रकर्षाने येतो. मर्यादित साधने, अनेक जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि त्याचबरोबर स्वतःच्या आयुष्यातील ध्येय, या सगळ्यांचा समतोल साधत पुढे जाणे ही एक प्रकारची रोजची परीक्षा असते.
कधी कधी आपण एखाद्या कामासाठी खूप प्रयत्न करतो, वेळ देतो, मेहनत घेतो पण अपेक्षित यश मिळत नाही. अशा वेळी मनात प्रश्न निर्माण होतो “इतके प्रयत्न करूनही माझ्या वाट्याला यश का आले नाही?”
याच प्रश्नाचे उत्तर मला गांधीजींच्या विचारांमध्ये मिळाले.
यशापेक्षा प्रयत्नांची प्रामाणिकता महत्त्वाची आहे. आपले काम सत्याच्या आणि आपल्या मूल्यांच्या आधारावर असेल, तर प्रत्येक वेळी बाहेरून मिळणाऱ्या कौतुकाची गरज भासत नाही. आपण केलेला प्रामाणिक प्रयत्न स्वतःमध्येच एक समाधान देतो.
गांधीजींनी सत्याचा शोध घेताना स्वतःच्या चुका मान्य केल्या. त्यांनी स्वतःला परिपूर्ण समजले नाही; उलट स्वतःच्या कमतरतांकडेही प्रामाणिकपणे पाहिले. ही गोष्ट  माझ्यासाठी खूप महत्त्वाची वाटली. कारण स्वतःला घडवत असताना आपण सतत शिकत असतो. प्रत्येक अपयश हे शेवट नसते; ते आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी देत असते.
आजूबाजूला काही लोक असूया ठेवतील, काही लोक आपल्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवतील, काही लोक आपल्या प्रयत्नांचे कौतुक करतील, तर काही जण टीका करतील. पण या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपल्या मार्गाचा निर्णय घेऊ नयेत. आपले ध्येय, आपली मूल्ये आणि आपली प्रामाणिकता हेच आपल्या मार्गदर्शनाचे आधार असले पाहिजेत.
गांधीजींचे आत्मचरित्र वाचताना मला जाणवले की परिस्थिती आपल्या हातात नसते; पण त्या परिस्थितीकडे आपण कसे पाहतो आणि त्यातून कसे पुढे जातो, हे आपल्या हातात असते, म्हणूनच आता अपयश आले तर थांबायचे नाही, टीका झाली तर खचायचे नाही, कोणी असूया ठेवली तर त्याला उत्तर देण्यात ऊर्जा वाया घालवायची नाही आणि आपल्याकडून कोणाला अपेक्षा असतील तर त्या अपेक्षांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न करायचा.
कारण शेवटी आपल्या आयुष्याचा खरा अर्थ इतरांनी आपल्याबद्दल काय म्हटले यात नसतो; आपण आपल्या कर्तव्याशी किती प्रामाणिक राहिलो, किती जणांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला आणि आपल्या प्रयत्नांमध्ये किती सत्य होते, यात असतो.
गांधीजींचे आत्मचरित्र माझ्यासाठी केवळ एक पुस्तक राहिले नाही. ते माझ्या संघर्षांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन बनले आहे.
   प्रयत्न करत राहायचे, सत्याशी प्रामाणिक राहायचे ,  या वाचनातून मिळालेली माझी सर्वात मोठी शिकवण आहे.

Comments

Popular posts from this blog

अनामिक🌼

     त्यादिवशी नाक्यात गेलेलो , फॉर्म भरला , ५००० जागा आणि एक माझी पोस्ट ह्या आशेवर , ओबीसीला ह्यावेळी जोराच माप मिळालं म्हणावं , सकाळपासून आहे इथेच भूक अनावर होत होती , वडापाव खात होतो पण कोणीतरी ओळखीचं आजू बाजूने जातच असत पण काही वेळा वेगळे भास होतात , तस पण सगळे हवं हवं असणार दृश्य शोधत असतात , मी कॉलेज वरून , कामावरून येणाऱ्या , मुली ,  स्त्रिया दिसतात का पाहायला नजर इकडे तिकडे केली , हो म्हणूनच , एक मुलगी जणू एवढ्या पावसात पण पाय घाण न होता चालत होती  , माझी नजर तिच्या पायांवर गेली , पैंजण होतं , पदवी शिक्षण झालं असेल , माझ्या वयाची आहे , पाय गोरे आहेत , सुंदर असणार , इतक्या अलगद कश्या चालू शकतात ह्या मुली , मला तर पाय साफ ठेऊन गाडी पण चालवता येत नाही , जन्मतः मुली अश्याच असतात का , किती काळजी घेतात स्वतःची , मी वर पाहिलं तर आखीव रेखीव शरीर , चेहरा गोलच , हो गोलच होता , एकंदरीत केस पण छान होती , मला छोटी केस आवडत नाहीत आणि आवडली तर पूर्ण बोबकट असावा , डोळे तिच्यावर स्थिर केले आणि तिने पण माझ्याकडे पाहिलं , मी चावा घेतला वड्यावर आणि नेमकं तेव्हाच हिने मला पह...

उभे असू जिथे, तिथे नवीन परीक्षा द्यायला🖤💫

           एक मोकळं माळरान आहे आणि मध्ये एकटंच झाड उभं आहे, पाठीमागे सूर्य मावळतोय, मस्त छटा दिसत आहेत, काही ढग काळे आहेत, काहींना सोनेरी कडा आहे. खाली जमीन तांबडी, तडे गेलेली. वाळलेल्या काड्या, जमवली तर फाटी जमतील गोयलाभर . सगळं शांत. पण त्या शांततेत एक कोलाहल पण जाणवतो आजकाल.... हुबेहूब वाटावं असं वातावरण.... आपण जन्माला येतो तेव्हाच पहिली परीक्षा सुरू होत असते, रडलास का नाही? श्वास घेतलास का नाही? वजन किती? पहिल्या दिवसापासून आपल्याला मोजलं जातं, तोललं जातं. मग शाळा सुरू होते. पाटी-पेन्सिल, दप्तराचं ओझं, आणि मार्कांचं टेन्शन. दहावी म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट. बारावी म्हणजे करिअरचा पाया. CET, नोकरीसाठी इंटरव्ह्यू, पैसे, व्यापार....पेपर संपतच नाहीत, आयुष्याचा पेपर कधी पुढे पुढे सरकत जातो समजतच नाही...    पण खरं सांगू? हे सगळे पेपर सोपे होते. कारण त्यात प्रश्न छापलेले असायचे. चार पर्याय असायचे. वेळ ठरलेली असायची. पास-नापासचा निकाल ठरलेला असायचा. पण इतर बितर चे प्रश्न आपण दूर लोटत जातो आणि खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा उत्तरप...

तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो 🩶

उन्माद संपून जाईल तेव्हा  खरे उरतील सकल जण  पण त्याविन मग काय उरेल  जमिनीत काय उगवेल  आणि कोण काय पुरेल  घरी काही,  कुणाला न बोलता येऊन दाखव  कुणाचा ना रुसवा घेऊन ये  न कुणाला दिसता फिरून दाखव  एक दिवस कुणाची शपथ न घेता ये  ये असाच कधीतरी रिकामे रिकामे सागर भर  टेबलाचे वेगळे वेगळे परिप्रेक्ष दाखव  दाखव माणसाची उत्क्रांती कशी झाली  किती मिथकं आणि किती गोष्टी लयास गेल्या  उरले सुरले कसे सावरले  आवरले आणि आवरून कसे माजले सारे  एकजात कसे  वातावरणीय ढोबळ मनाने अंदाज बांध  महामारीवर रडलास तसं युद्धावर रडून दाखव  फोड खापर असंख्य गोष्टींवर जगावर  नाहीतर नाही तर, तारे आहेत लुकलूकतात  त्यांची उत्पत्ती बोल  ठिपका आहोत आपण असे मार एक एक  झोपी जाऊन पुन्हा ये ग्लिच बनून मित्रा  तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो.....